प्रतिष्ठा न्यूज/ सांगली प्रतिनिधी
खानापूर: दि. १४ जून २०२६ – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (रजि.), दिल्ली यांच्या वतीने संत निरंकारी मंडळाच्या खानापूर शाखेअंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १२७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
शिबिराचे उद्घाटन आमदार सुहास (भैय्या) बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खानापूर पंचायत समितीचे उपसभापती सुहास शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सही शिंदे, पंचायत समिती सदस्य पांडुरंग खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी संत निरंकारी मंडळाच्या सामाजिक व मानवतावादी कार्याचे कौतुक करत मंडळाची विचारधारा समाजाला एकत्र आणणारी असल्याचे सांगितले. तसेच अशा समाजोपयोगी उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
खानापूर पंचायत समितीचे उपसभापती सुहास शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून समाजाप्रती आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी खानापूर संयोजक दत्तात्रय जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपाशीर्वादाने मानवकल्याणाचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. तत्कालीन सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या "मानवाला मानव प्रिय असावा, एकमेकांचा आधार बनावा" या शिकवणुकीनुसार संत निरंकारी मिशन विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आज विज्ञानाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली असली तरी रक्ताला पर्याय निर्माण करता आलेला नाही. त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज असून प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रक्तदान शिबिरादरम्यान डॉ. वैशाली हजारे, डॉ. अप्पासाहेब पाटील, गटविकास अधिकारी हरिश्चंद्र माने, एसबीआय बँक विटाचे व्यवस्थापक रोहित नायकुडी, जे. पी. टिंगरे, सराफ असोसिएशन खानापूरचे अध्यक्ष सुधीर पवार, नगरसेवक आनंदराव स्वामी, शिवसेना तालुकाध्यक्ष दादा भगत, स्वप्निल मंडले, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर बाबर तसेच बानूरगडचे सरपंच सज्जन बाबर यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
रक्तसंकलनाचे कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, मिरज तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली यांच्या वैद्यकीय पथकाने केले. शिबिरात खानापूर परिसरातील संत-महापुरुष, माता-भगिनी तसेच युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सातारा झोनचे झोनल इन्चार्ज नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर संयोजक दत्तात्रय जगताप, सेवादल व स्वयंसेवकांनी शिबिराचे नियोजन केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या