सांगली प्रतिनिधी : संगीताचार्य द. वि. काणेबुवा फाउंडेशनतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांमधील शास्त्रीय संगीताच्या सुरेल प्रवासावर आधारित रागदारी आणि लतादीदी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . शनिवार दिनांक २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता मारुती चौकातील गुरुकुल संगीत विद्यालयाच्या काकासाहेब चितळे सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संचालिका विदूषी मंजुषा पाटील यांनी दिली.
लतादीदींचा स्वर हा भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर ठेवा आहे. त्यांच्या असंख्य गीतांमध्ये शास्त्रीय संगीताचे विविध रंग अनुभवायला मिळतात. अनेक गीते विशिष्ट रागांवर आधारित आहेत, तर काही गीतांमध्ये ठुमरी, गझल आणि पारंपरिक बंदिशींचे सुंदर प्रतिबिंब दिसून येते. या गीतांमागील रागदारी, त्यांचे संगीतशास्त्रीय पैलू, तसेच लतादीदींच्या गायकीतील सूक्ष्म बारकावे यांचे रसपूर्ण विवेचन आणि गायनासह सादरीकरण या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण सुप्रसिद्ध गायक, अभ्यासक आणि लेखक पं. अमरेंद्र धनेश्वर यांचे आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेचा त्यांचा सखोल अभ्यास असून संगीतविषयक संशोधन, लेखन, व्याख्याने आणि रसग्रहण कार्यक्रमांमुळे त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि रसाळ मांडणीमुळे शास्त्रीय संगीताची जाण असणाऱ्या तसेच सामान्य रसिकांनाही हा कार्यक्रम तितकाच आनंददायी ठरणार आहे.यावेळी तबला साथ महेश देसाई तर हार्मोनियम साथ स्वरूप दिवाण करणार आहेत.तरी सर्व संगीतप्रेमी आणि रसिकांनी या अनोख्या संगीत मैफिलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या