सांगली, दि.१६ : राज्य शासनावर बिनबुडाचे आरोप करीत सांगली जिल्हा पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न खासदार विशाल पाटील करीत आहेत. केवळ राजकीय हेतूने असे आरोप होणे योग्य नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ज्या वेदांत बंडगर यांच्या खून प्रकरणाबाबत खासदार पाटील बोलले आहेत त्या संदर्भात पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या प्रमुख साथीदाराला अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. तपास वेगाने सुरू आहे. राज्य शासन आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी या संदर्भात कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही, कुणाला पाठीशी घातले जाणार नाही आणि कुणावर अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
असे असताना पोलीस निरीक्षकांपासून ते जिल्हा पोलीस प्रमुखांपर्यंत हप्ते बांधून आणि दर ठरवून त्यांची नेमणूक झाल्याचे खासदार पाटील यांचे आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. कुठलेही पुरावे न देता निराधार आरोप करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होऊ नये. संपूर्ण पोलीस दलावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदा सुव्यवस्थेबाबत अत्यंत दक्ष आणि काटेकोर आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्ह्यांबाबत कठोर कारवाई पोलीस दल आणि गृह खाते करीत आहे. अशावेळी अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. सांगली जिल्ह्यात आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या विविध घटना घडल्या असताना त्यावेळी राज्यात कुणाचे सरकार होते याचीही माहिती संबंधितांनी घ्यावी आणि त्यानंतरच परिस्थितीवर भाष्य करावे.
खासदार पाटील यांनी एकूणच सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराबाबत बोलावे, याबाबतही निवेदनात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी म्हटले आहे की ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या, अशांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलावे हा मोठा विरोधाभास आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही असा दावा खासदार पाटील करीत आहेत. ते ज्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत, त्या बँकेमार्फत सुरू असलेल्या खरीप पीक कर्जवाटपाची माहिती घेऊन त्यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जवाटपाबाबतचे वास्तव समोर आणावे, असे आव्हानही भाजप नेत्यांनी दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या