सांगली प्रतिनिधी : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मनपा शाळा क्रमांक ७, सांगली येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन तसेच पुष्पसृष्टी करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा नेते शेखर इनामदार हे होते.
यावेळी विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. तसेच आयुक्त महोदया यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या वह्यांचाही विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी गोड शिर्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे शाळेतील वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण झाले होते.
यंदा नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. सध्या शाळेची एकूण पटसंख्या ४८२ इतकी असून २०२० साली केवळ ६४ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला शाळेचा प्रवास आज उल्लेखनीय उंचीवर पोहोचला आहे. विश्रामबाग परिसरातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत मनपा शाळेने केलेली ही प्रगती निश्चितच कौतुकास्पद मानली जात आहे.
मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते यांनी स्वागत व प्रास्ताविक करत शाळेची वाटचाल, शैक्षणिक उपक्रम आणि विविध उपलब्धींची माहिती दिली. तसेच शाळेसमोरील काही आवश्यक प्रश्न व मागण्या मान्यवरांसमोर मांडल्या.
यावेळी बोलताना शेखर इनामदार यांनी शाळेसाठी अतिरिक्त वर्गखोल्या, स्कूलबस व शिक्षकांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तसेच महापौर आणि आयुक्त यांची संयुक्त भेट शाळेत आयोजित करून शाळेच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
दत्तक पालक म्हणून राकेश दड्डणावर यांनी निर्धार फौंडेशनच्या माध्यमातून शाळेसाठी केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती देत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करीत चालू शैक्षणिक वर्षात अधिकाधिक लोकसहभाग मिळवून शाळेसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास महापालिकेचे लिपिक सुशांत कांबळे यांच्यासह गुराण्णा बगले, सचिन भोसले, सुरेश जाधव, कविता पाटील, सुप्रिया पाचोरे, प्रतिभा माने, कविता पाटील,शैलजा कांबळे, मनीषा थिटे, प्रियंका कांबळे, स्नेहल शिरोळे, शुभांगी कोलप आदी शिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या