सांगली, प्रतिनिधी : बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून तिच्याकडून सुमारे ६ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विटा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष मोहीम राबविली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
एलसीबीचे पोलीस अंमलदार अरुण पाटील व रज्जाक थोरात हे सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, एक महिला बसस्थानक परिसरात महिलांच्या पर्समधून चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले.
चौकशीत संबंधित महिलेने आपले नाव कांता मारुती काकडे (वय ५६, रा. कानन नगर, झोपडपट्टी, नागाळा पार्क, कोल्हापूर) असे सांगितले. तिची अंगझडती घेतली असता तिच्या पर्समध्ये कपड्यात गुंडाळून ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली. पुढील चौकशीत विटा एस.टी. बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून चोरी केल्याची कबुली तिने दिली.
आरोपीकडून ६ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ६ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलीस अंमलदार सपना गराडे, अरुण पाटील, रज्जाक थोरात, संदीप गुरव, उदयवीर माळी, नितीन बंडे आणि विनायक सुर्वे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास विटा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या