पलूस प्रतिनिधी : रामानंदनगरचा सुपुत्र तथा उदयोन्मुख धावपटू अनिकेत अनिल नलवडे याची चीन येथे होणाऱ्या आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 साठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पलूस येथील जनसंपर्क कार्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार तुकाराम धायगुडे, आमिर पठाण, पद्मभूषण विखे-पाटील कृषी परिषदेचे संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अंकुश राजमाने, विकी तातुगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी बोलताना प्रदीप (आप्पा) कदम म्हणाले, "अनिकेतने मिळवलेले हे यश त्याच्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समर्पणाचे फळ आहे. नलवडे कुटुंबासह रामानंदनगर गाव, पलूस तालुका आणि संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आगामी स्पर्धेत अनिकेतने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करून महाराष्ट्रासह आपल्या पलूस तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे आणि देशाचा तिरंगा उंच फडकवावा."
या सत्कार सोहळ्यास अनिकेतचे आजोबा भीमराव नलवडे, वडील अनिल नलवडे, आई जयश्री (ताई) नलवडे तसेच भाऊ संकेत नलवडे उपस्थित होते. आपल्या मुलाचा होत असलेला सन्मान आणि त्याच्या यशाचे कौतुक पाहून संपूर्ण नलवडे कुटुंब भारावून गेले. विशेषतः नातवाच्या यशाचा गौरव होताना आजोबा भीमराव नलवडे यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. त्यांच्या चेहऱ्यावर कष्टाचे चीज झाल्याचा आनंद आणि अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता.
अनिकेत नलवडेच्या या उल्लेखनीय यशामुळे रामानंदनगरसह संपूर्ण पलूस तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या