सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तडीपार आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या कब्जातून दोन धारदार लोखंडी कोयते जप्त केले आहेत.
मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दोन संशयित इसम धारदार शस्त्रे घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने जुनामिर्जे रोड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने तत्काळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इजाज उर्फ एजाज अल्लाउ शेख (वय २२, रा. उर्दू शाळेजवळ, अमननगर, मिरज) आणि मलिकजान उर्फ सोहेल राजू नदाफ (वय २५, रा. कॅनॉल रोड, लक्ष्मी मंदिराजवळ, मिरज) यांचा समावेश आहे.
पोलीसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सुमारे एक हजार रुपये किमतीचे दोन धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींना सांगली जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्षम प्राधिकरणाने बंदी घातलेली असतानाही ते जिल्ह्यात फिरत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या