सांगली : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विश्रामबाग येथील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या काही वेळाच्या पावसानंतरच भुयारी मार्ग जलमय झाल्याने दुचाकीस्वार, पदचारी आणि कामगारांची मोठी तारांबळ उडाली.
भुयारी मार्गात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने अनेक दुचाकी बंद पडल्या. काही वाहनचालकांनी जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तर काहींना वाहने बाहेर काढण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागली. पाण्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्यात या भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “एका पावसातच भुयारी मार्गाची ही अवस्था होत असेल, तर पुढील मुसळधार पावसात काय होईल?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या या भुयारी मार्गामुळे विद्यानगर, वारणाली, अष्टविनायक नगर आणि गंगानगर परिसरातील नागरिकांची दैनंदिन ये-जा सुलभ होते. मात्र पाणी साचल्याने या भागातील रहिवासी, कामगार आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः पदचाऱ्यांसाठी हा मुख्य मार्ग असल्याने त्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी महापालिका प्रशासनाने तातडीने पाण्याचा उपसा करून वाहतूक सुरळीत करावी तसेच भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था, नियमित ड्रेनेज सफाई आणि कायमस्वरूपी पंपिंग यंत्रणा उभारावी, अशी मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या