विटा, प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होत असताना शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दिपक लाड यांनी मराठा समाजाला थेट प्रश्न विचारत, "अठरापगड जातीच्या मराठ्यांचा शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्याचा वाण संपला का?" असा परखड सवाल उपस्थित केला आहे. शेतकरी, शेती आणि गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना समाजातील अनेक घटकांची शांत भूमिका चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ॲड. लाड म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा समाजाची ओळख केवळ एका जातीची नसून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या आणि समाजहितासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अठरापगड परंपरेची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपासून ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत मराठा समाजाने अन्यायाविरोधात लढण्याचा इतिहास घडवला आहे. मात्र आज हजारो एकर सुपीक जमीन, शेकडो शेतकरी कुटुंबे आणि अनेक गावांचे भविष्य धोक्यात आले असताना समाजाचा मोठा वर्ग शांत का आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या मते, शक्तीपीठ महामार्ग हा केवळ विकास प्रकल्पाचा विषय नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर सुपीक शेती संपादित होणार असून अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जमीन गेल्यानंतर मिळणारा मोबदला काही वर्षांत संपेल; मात्र शेती गेल्यानंतर कायमस्वरूपी उपजीविकेचा आधार हरवणार आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ आर्थिक नसून सामाजिक आणि पिढ्यान्पिढ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे.
"आज प्रश्न फक्त जमिनीचा किंवा मोबदल्याचा नाही. प्रश्न आपल्या मातीचा, पाण्याचा, शेतीचा, गावांच्या अस्तित्वाचा आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा आहे. अठरापगड जातीच्या मराठ्यांनी इतिहासभर शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष केला. मग आज शेतकऱ्यांवर अस्तित्वाचे संकट आले असताना तो लढाऊ बाणा कुठे गेला?" असा सवाल ॲड. लाड यांनी केला.
शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या संघर्षात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या शेतात यंत्रसामग्री पोहोचण्यापूर्वीच लोकशक्ती उभी राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला राज्यातील विविध भागांतून वाढता पाठिंबा मिळत असून अनेक शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक या लढ्यात सहभागी होत आहेत. त्यामुळे हा संघर्ष आता केवळ एका प्रकल्पाविरोधातील आंदोलन न राहता शेतकऱ्यांच्या हक्क, जमीन आणि अस्तित्वाच्या संरक्षणासाठीच्या व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे.
उपमथळा : "शक्तीपीठाचा लढा केवळ जमिनीचा नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे; समाजाने आता मौन सोडून रस्त्यावर उतरावे" – ॲड. दिपक लाड
शेती, शेतकरी, पर्यावरण आणि जैवविविधता या सगळ्यांचा विध्वंस करणारा, भ्रष्टाचाराचे कुरण असणारा आणि काही निवडक उद्योगपतींचे उखळ पांढरे करणारा हा शक्तिपीठ महामार्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातूनच हद्दपार केला पाहिजे.
उत्तर द्याहटवा