सांगली, दि. ०६ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते व्यवस्थापन, शौर्य आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे जागतिक प्रतीक आहेत. त्यांनी शून्यातून स्वराज्य उभे केले आणि अठरापगड जातींच्या अफाट जनतेला एकत्र आणून सुरक्षित व न्याय्य समाज निर्माण केला. शिवरायांनी त्या काळी राबवलेली जलव्यवस्थापन, कृषी धोरणे, आरमार उभारणी आणि पर्यावरणपूरक रणनीती आजही आधुनिक जगासाठी मार्गदर्शक आहे."
पुढे बोलताना आ. गाडगीळ म्हणाले की, "महाराजांनी घालून दिलेला स्वाभिमान, शौर्य आणि लोककल्याणाचा आदर्श आजही संपूर्ण समाजासाठी आणि आपल्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या याच विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प आज आम्ही करत असून, 'स्वाभिमान, पराक्रम आणि जनकल्याण' या त्रिसूत्रीवर आधारित लोकसेवेचे कार्य पुढे नेण्याचा आमचा ठाम निर्धार आहे."
यावेळी पदाधिकारी यांनी शिवरायांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करत त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा अर्पण केला.
यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, सांगली मनपा स्थायी समिती सभापती अतुल माने, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजीत पाटील, विलास काळेबाग, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक रवींद्र सदामते, मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, राहुल नवलाई, कृष्णा राठोड, अमर पडळकर, शुभम देसाई, शुभम चव्हाण, भालचंद्र बक्षी, अर्जुन मजले, सुनील भोसले, राजू पठाण, गणपत साळुंखे, सागर बिजरगी, यांच्यासह सांगली जिल्हा भाजपाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या