पलूस प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. ३१ मे) पलूस येथे यशस्वी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांनी दिली.
तासगाव रोड पलूस येथील शिवशंभो मल्टीपर्पज हॉलमध्ये सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात वाणीभूषण प्रा. एन. डी. बिरनाळे यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताच्या न्यायप्रिय, दूरदृष्टीच्या आणि लोककल्याणकारी राज्यकर्त्या होत्या. ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे त्यांचा जन्म झाला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रजेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शेती, व्यापार, उद्योग तसेच सामाजिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजापुढे ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्राध्यापक बिरनाळे हे अत्यंत अभ्यासू असे वक्ते आहेत. राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. त्यामुळे त्यांचे व्याख्यान अत्यंत श्रवणीय असे होणार आहे.
पलूस, कडेगाव व परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून व्याख्यानाचा व सन्मान सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदीप आप्पा कदम यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या