सांगली : बेंगलोर–मुंबई विशेष रेल्वे गाडीचे आज सांगली रेल्वे स्थानकावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी महावितरणच्या संचालिका नीताताई केळकर, प्रवीण दिवाणजी, विशाल पवार, रमेश आरवाडे तसेच रेल्वे प्रवासी ग्रुपचे इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर विशेष रेल्वे गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार असून मुंबई व बेंगलोरला जाणाऱ्या प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी नागरिक जागृती मंच, सांगली जिल्हाचे सतिश साखळकर यांनी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाकडे आणखी नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, आता रेल्वेचा डबल ट्रॅक पूर्ण झाला असून इलेक्ट्रिक केशनचे कामही पूर्णत्वास आले आहे. सध्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर सरकारनेही सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच शिर्डी प्रवासासाठी वंदे भारत रेल्वेचा वापर केला होता. अशा प्रकारच्या आधुनिक व मुबलक रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यास नागरिक निश्चितपणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देतील, असे मतही व्यक्त करण्यात आले.
केंद्र सरकारने प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन सांगलीसह राज्यातील विविध मार्गांवर अधिक रेल्वे गाड्या सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती नागरिक जागृती मंचाच्या वतीने करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या