प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सांगलीच्या पथकाने आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रणजित श्रीरंग लोखंडे (वय २४, रा. मल्हारवाडी, मंगसुळी, ता. कागवाड, जि. बेळगाव) असे आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकाने २३ मे रोजी सांगली शहरात पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे वसंतदादा मार्केट परिसरात सापळा रचला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी आणणार होता. पोलिसांनी निगराणी ठेवून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विश्रामबाग, मिरज शहर, मिरज ग्रामीण, एमआयडीसी कुपवाड तसेच कर्नाटकातील कागवाड, कुडची व चिंचली परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो एचएफ १००, एचएफ डिलक्स तसेच सुझुकी कंपनीच्या अशा एकूण ९ मोटारसायकली जप्त केल्या. जप्त वाहनांची किंमत ५ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.
तपासात विश्रामबाग, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड, मिरज ग्रामीण तसेच कागवाड पोलीस ठाण्यात दाखल असलेले ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, अमित परिट, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, आमसिध्दा खोत, सोमनाथ गुंडे, श्रीधर बागडी, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, अभिजीत पाटील, विजय पाटणकर व कॅप्टन गुंडवाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या