प्रतिष्ठा न्यूज/ कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर : ग्रंथालय आणि ग्रंथांवर नितांत प्रेम करणाऱ्या, कुशल प्रशासक व ‘ज्ञानमाऊली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे (वय 53) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
प्राचार्या गावडे यांनी शिक्षण महर्षी परमपूज्य बापूजी साळुंखे आणि प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. 2008 पासून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळत संस्थेच्या 410 हून अधिक संस्कार केंद्रांचे प्रभावी नेतृत्व केले. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालय हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. ग्रंथालयात येणाऱ्या नव्या पुस्तकांचा अभ्यास, वाचन आणि विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. शैक्षणिक, धार्मिक व अध्यात्मिक विषयांवरील विपुल वाचन त्यांनी केले होते. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, स्वामी विवेकानंद तसेच शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या जीवनकार्यावरील ग्रंथांचे त्यांनी सखोल अध्ययन केले होते.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात त्यांचे पीएच.डी. संशोधन कार्य सुरू होते. संशोधनासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांचा त्यांनी अभ्यास करून त्याच्या टिपणाही तयार केल्या होत्या. ग्रंथालयांचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन पुस्तकांची उपलब्धता यासाठी त्या सतत आग्रही असत.
ग्रंथपाल, प्राध्यापक, शिक्षक आणि प्रशासकीय सहकाऱ्यांशी त्यांनी माऊलीप्रमाणे प्रेमाने वागणूक दिली. त्यामुळेच ‘ज्ञानमाऊली’ ही त्यांची ओळख निर्माण झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्येही त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी केली.
त्यांच्या कार्यकाळात नर्सिंग, लॉ, हॉटेल मॅनेजमेंटसह विविध शैक्षणिक शाखांचा विस्तार झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शिक्षक, प्राध्यापक आणि लाखो विद्यार्थी घडले. संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांची वाटचालही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच घडली.
प्राचार्या गावडे यांच्या अकाली निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना व्यक्त होत आहेत.
— डॉ. नीता पाटील
ग्रंथपाल, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या