पलूस प्रतिनिधी : प्रस्तावित 'शक्तीपीठ' प्रकल्पाच्या विरोधात पलूस आणि कडेगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून, या प्रकल्पामुळे सुपीक शेती, ऊस उत्पादन आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. येत्या ४ मे रोजी सर्वपक्षीय जाहीर शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून प्रकल्पाविरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन घोगाव येथे ॲड. दीपक लाड यांनी केले.
शक्तिपीठ विरोधात विराट एल्गार मा खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील ,आमदार डॉ विश्वजीत कदम आमदार अरुण आण्णा लाड, आमदार सुहास बाबर, पृथ्वीराज बाबा देशमुख संग्राम भाऊ देशमुख यांच्या सह सर्वपक्षीय नेते व चळवळीतील नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. शेतकरी पुत्र रविराज- साबळे पाटील यांची विशेष उपस्थित राहणार आहेत असे -संघर्ष समितीचे निमंत्रक- अँड दिपक लाड यांनी सांगितले.
ॲड. लाड म्हणाले की, 'शक्तीपीठ' असे आकर्षक नाव देऊन प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे नुकसान करणारा हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न होत आहे. पलूस आणि कडेगाव तालुका हा ऊस शेतीसाठी ओळखला जातो. मात्र या प्रस्तावित महामार्गामुळे सुमारे २० ते २५ टक्के ऊस शेती बाधित होणार असून, याचा थेट परिणाम स्थानिक साखर कारखान्यांवर होणार आहे. यामुळे आणखी मोठा फटका बसू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या मोठ्या भरावामुळे भविष्यात मानवनिर्मित पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन धोक्यात येऊ शकते, असा आरोपही त्यांनी केला. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सागरेश्वर अभयारण्य परिसर आणि तेथील जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली.
"आमचा विरोध हा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, बिघडणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीविरोधात आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, प्रसंगी रक्त सांडण्याचीही तयारी आहे,' असे ॲड. लाड यांनी सांगितले.
येत्या ४ मे रोजी आयोजित सर्वपक्षीय जाहीर शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून प्रकल्पाविरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन केले. घोगाव येथील या समेला परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या