चिंचणी प्रतिनिधी चिंचणी (ता. तासगाव) येथील 'ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार' हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून कार्य करणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित, विठ्ठलराव पागे विद्यामंदिर, चिंचणी येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत चिंचणी गावाला 'ओडीएफ प्लस' (ODF Plus) श्रेणीत नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. “चिंचणी गावातील कचरा व सांडपाणी व्यवस्थापन : स्थिती, समस्या आणि उपाययोजना” या विषयावर आधारित सविस्तर अहवाल आज १ मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत प्रशासनाला सादर करण्यात आला.
*।। उपक्रमाची प्रेरणा व प्रस्तावना ।।*
सदर उपक्रम आणि सर्वेक्षणाचे आयोजन करताना शाळेला संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय अविनाशकाका पाटील यांची मोलाची प्रेरणा लाभली. अहवालाच्या प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे, शाळा ही केवळ ज्ञानाचे केंद्र नसून ती समाजाच्या परिवर्तनाचे माध्यम आहे. याच भूमिकेतून चिंचणी चे जिल्हा परिषद सदस्य अक्षय भैय्या पाटील, चिंचणी गावचे माजी सरपंच श्री सदाशिव आबा माळी उपसरपंच श्री. भागवत (दादा) जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ मार्गदर्शक यांच्या सहकार्याने हे व्यापक सर्वेक्षण यशस्वी झाले.
*।। पाच दिवसांचा 'डिजिटल' संकल्प ।।*
या उपक्रमाचे संकल्पक श्री. एस. आर. जाधव (सर) , कु. एस.पी.पाटील मॅडम श्री दगडे सर यांनी नागरिक शास्त्र विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी या मोहिमेचे नियोजन केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केवळ पाच दिवसांच्या विक्रमी कालावधीत, गावातील ९७५ कुटुंबांशी प्रत्यक्ष संवाद साधला. गुगल फॉर्म या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून संकलित केलेल्या या माहितीमध्ये गावातील स्वच्छतेची सद्यस्थिती, कचरा वर्गीकरणाचे प्रमाण आणि सांडपाणी विल्हेवाटीच्या समस्यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यात आला आहे.
। *। मान्यवरांच्या उपस्थितीत अहवाल सुपूर्द ।।*
आज ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा सविस्तर अहवाल उपसरपंच श्री. भागवत (दादा) जाधव आणि ग्रामसेवक श्री. राजकुमार माळी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपक्रमाचे संकल्पक श्री. एस. आर. जाधव, या मोहिमेत मोलाचे सहकार्य करणारे ज्येष्ठ शिक्षक श्री. ए. जी. दगडे (सर) व कु.एस.पी. पाटील (मॅडम) उपस्थित होते. तसेच या कार्यात पावलोपावली साथ देणारे श्री. पी. डी. पाटील (सर) यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
। *। अहवालातील प्रमुख निष्कर्ष व शिफारसी ।।*
सर्वेक्षण अहवालात विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाच्या शिफारसी सुचवल्या आहेत:
*घनकचरा* : कोणत्या प्रभागात सार्वजनिक कचरा कुंड्यांची तातडीने गरज आहे, याचे नेमके ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.
*सांडपाणी* : उपसा सांडपाणी रस्त्यावर वाहू नये यासाठी कुठे सामूहिक शोषखड्डे आवश्यक आहेत, याची तांत्रिक माहिती देण्यात आली आहे.
*अनुभव कथन* : विद्यार्थी प्रतिनिधी राजवर्धन पाटील याने सर्वेक्षणादरम्यान आलेले अनुभव सांगताना स्पष्ट केले की, या उपक्रमामुळे आम्हाला एक जबाबदार नागरिक म्हणून काय कर्तव्ये असतात, याची जाणीव झाली.
*।। ग्रामपंचायतीचा गौरवपूर्ण प्रतिसाद ।।*
अहवाल स्वीकारताना उपसरपंच श्री. भागवत (दादा) जाधव म्हणाले की, "हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी श्री. एस. आर. जाधव सर कु. एस.पी.पाटील मॅडम श्री दगडे सर या सहकाऱ्यांच्या मदतीने हे सर्वेक्षण पूर्ण करून ग्रामपंचायतीला एक ठोस दिशा दिली आहे. या अहवालातील शिफारसीनुसार ग्रामपंचायत निश्चितपणे उपाययोजना करेल. इथून पुढच्या काळात गावाच्या जडणघडणीत आम्ही या विद्यार्थ्यांचे व शाळेचे सहकार्य कायम घेऊ." ग्रामसेवक श्री. राजकुमार माळी यांनीही विद्यार्थ्यांच्या या शास्त्रीय कामाचे कौतुक केले. या उपक्रमाने सर्वच गावासमोर या विद्यार्थ्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला असून, सामाजिक भान असणारी ही पिढी देशाचे भविष्य उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला.
*अभिमानास्पद* : चिंचणीच्या ९७५ कुटुंबांचा कौल घेत तयार झालेला हा अहवाल आता गावाच्या 'स्वच्छता आराखड्या'चा कणा ठरणार आहे! 🌍♻️ पंचक्रोशीत सर्वत्र या सर्वेक्षण उपक्रमाचे कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या