पलूस प्रतिनिधी : वाढत्या तापमानामुळे द्राक्ष व हळद या पिकांवर दुष्परिणाम होतात तसेच इतर पिके ही धोक्यात येतात म्हणून शेतीची काळजी घेण्यासाठी मल्चींग व पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष द्राक्ष तज्ज्ञ मारूतीनाना चव्हाण व हळद संशोधक प्रा प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी केले.
वाढत्या तापमानामुळे द्राक्ष व हळद शेतीवर होणारे परिणाम व करावयाच्या उपाययोजना या विषयावर शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा पलूस येथे पार पडली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती व पद्मश्री डॉ विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी तज्ज्ञ बोलत होते.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. वृक्षतोडीमुळे वातावरणाचा पारा चढला आहे म्हणून १ लाख ३५ हजार झाडे लावण्याचा आम्ही निर्धार केला आहे, असे प्रदीपआप्पा पाटील यांनी सांगितले. या सर्व झाडांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असून पुढील वर्षी त्याची लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती नुकतीच झाली त्या पार्श्वभूमीवर १ लाख ३५ हजार झाडांची लागवड आम्ही करणार आहोत. वाढत्या तापमानामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे ते टाळण्यासाठी काय करावे हे शेतकऱ्यांना कळावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. शेतकरी जगला तरच जग चालते. वृक्षतोडीमुळे वातावरणाचा ताप वाढला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची आणि आपण ज्याला जीवापाड जपतो त्या शेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शेतीचे नियोजन केले पाहिजे. अतोनात पाणी वापरणे थांबवले पाहिजे.
मारूती चव्हाण म्हणाले, शेतकरी आता तज्ञांवर विश्वास ठेवण्या ऐवजी सोशल मीडियावर विश्वास ठेवून उपाय योजना करत आहेत. त्यामुळे नुकसान होते. दरवर्षी हवामान बदलते त्यामुळे युट्यूबवर योग्य ज्ञान मिळेल असे नाही. जग फार पुढे आहे आपण खूप मागे आहोत. स्मॉल स्कील फार्मिंगची आवश्यकता आहे. आंदोलन केले म्हणून द्राक्षाला दर मिळाला. चिनचे स्मॉल स्केल फार्मिंग आपल्याकडे आणायचे आहे. पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. शेती का परवडत नाही. परवडते पण त्यासाठी योग्य वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. आज आपल्याला उष्णतेची समस्या निर्माण झाली आहे. त्याची अनेक कारणे आहेत. आपण वृक्षतोड प्रचंड केली आहे. झाडं लावली तरच तापमान कमी होऊ शकते. फळझाडे मोठ्या प्रमाणात लावणे गरजेचे आहे. क्रॉंक्रीट इमारती, रस्ते पाहीजेत परंतु त्याप्रमात वृक्ष लागवड आपण करतो का याचा विचार केला पाहिजे. डोळे उघडून सामाजिक बांधिलकी म्हणून याचे गांभीर्य लक्षात घ्या. गारपीटीला तोंड द्यावे लागते. कोकण पट्ट्यात गारपीट होत नाही कारण तिथे झाड जास्त आहेत. गारपीटीतून वाचण्यासाठी झाडं लावली गेली पाहिजेत. उष्णतेचा द्राक्षावर वाईट परिणाम होतो. ३५ अंश तापमान द्राक्ष झाडास ठिक आहे. त्यापेक्षा जास्त तापमान चालत नाही. उपाय योजना केल्या पाहिजेत.
हळद संशोधक प्रा प्रतापसिंह मोहिते पाटील म्हणाले, सध्या महाराष्ट्रातले तापमान हे 22°c ते 48 अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. आशा वातावरणामध्ये हळद किंवा आल्याची लागवड करू नये. पाऊस पडल्याशिवाय या पिकाची लागवड करू नका अन्यथा बियाणे वाया जाण्याची शक्यता आहे. किमान १५ मे पर्यंत हळदीची लागवड करू नये. पाऊस सुरू झाल्यावरच करावी. बियाणे योग्य आहे याची खात्री करून घ्यावे. थोडे फुगलेले बियाणे वापरावे. हळदीचे उत्पादन एकरी ४२ टना पर्यंत निघू शकते त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध तयारी करणे आवश्यक आहे. वाढत्या उष्णतेची लाट लक्षात घेता जिथे आपण लागवड करणार आहोत त्या शेतीची आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज आहे. वृक्षतोडीमुळे वातावरण तापले हे सर्वजण आपण मान्य करतो परंतु वृक्ष रोपण करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. प्रदीपआप्पा कदम यांनी केलेला वृक्षतोडीचा संकल्प अत्यंत महत्त्वाचा असून शेतकरी व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे.
द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव तुकाराम माळी , प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव, मानसिंग सहकारी बँकेचे संचालक अजित पुदाले, द्राक्ष बागायतदार संघाचे जितेंद्र जाधव, पद्मश्री डॉ विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष व कार्यशाळेचे निमंत्रक पैलवान संजयदादा शिंदे, तुषार सूर्यवंशी अभिजीत सावंत, अभिजीत कौलगे, तोफिक मुल्ला, भास्कर संकपाळ, सागर कदम, विकास कदम, दौलत पाटील, आशिष सूर्यवंशी, विलास पाटील मोराळे, अनिल पाटील, उल्हास पाटील, रणजीत शिंदे, अमीर पठाण, सुनील काका सावंत, सुदर्शन हजारे, अंकुश गस्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या