प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तालुक्यातील आरवडे येथे सोमवारी (दि. 27) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला आहे. चारचाकी स्विफ्ट (एम.एच.10 सीएन 4481) आणि हिरो होंडा दुचाकी (एम.एच.10 डी सी 5388) यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत विलास माळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश पवार (कुंडल) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी केवळ वाहन चालकालाच नव्हे, तर सार्वजनिक बांधकाम विभागालाही जबाबदार धरत सहआरोपी करण्याची जोरदार मागणी केली आहे.
⚠️ “दोन वर्षांपासून मागणी, तरीही दुर्लक्ष”
आरवडे गावाजवळ तासगाव-भिवघाट राज्य महामार्गावर हरे कृष्ण मंदिर ते स्मशानभूमी दरम्यानचा परिसर अत्यंत धोकादायक बनला आहे.येथे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वारंवार अपघात होत आहेत. ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी सातत्याने केली होती. मात्र, संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
🛑 शाळा, बसथांबा, मंदिर... तरीही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
या परिसरात दोन शाळा, बसथांबा आणि इस्कॉन (हरे कृष्ण) मंदिर असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा संवेदनशील ठिकाणीही कोणतीही सुरक्षितता उपाययोजना न केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
📊 नोंदींचा अडथळा – अपघात असूनही दाखले नाहीत
प्रशासनाकडून गतिरोधक बसवण्यासाठी अपघातांच्या अधिकृत नोंदींची मागणी केली जात आहे. मात्र, किरकोळ अपघातांची पोलिसांत नोंदच होत नसल्याने ही प्रक्रिया अडकून पडली आहे. परिणामी, प्रत्यक्षात धोका असतानाही उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
🗣️ “गतिरोधक असता तर जीव वाचला असता” – बालाजी पाटील
“या भागात अनेक वेळा अपघात झाले आहेत.आम्ही वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले.जर गतिरोधक बसविण्यात आले असते, तर हा अपघात टळला असता आणि एक निष्पाप जीव वाचला असता,”
— बालाजी पाटील, आरवडे
🔥 ग्रामस्थांचा इशारा
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून,तात्काळ गतिरोधक बसवावेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या