विकासाच्या नावाखाली शेती व शेतकऱ्यांचे नुकसान करणारा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष थांबणार नाही, असा ठाम निर्धार ईश्वरपूर येथे आयोजित सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी एकदिलाने, खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत लढा देण्याचे आवाहन या मेळाव्यातून करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करताना उपरोधिक भाषेत भूमिका मांडली. “कोणताही देव आपल्या भक्तांचे वाटोळे करून रस्ता व्हावा असे कधीच इच्छित नाही. मात्र सरकारमधील एका ‘देवा’ला हा मार्ग व्हावा असे वाटत आहे. त्याला आपण मुंबईत जाऊन साकडे घालू, गोड बोलून समजावू; आणि तरीही ऐकले नाही, तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषेत उत्तर द्यावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.
या महामार्गासाठी कोणत्याही परिस्थितीत शेतीची मोजणी होऊ देणार नाही, असा ठराव मेळाव्यात घेण्यात आला. बाधित गावांच्या ग्रामसभांमधून तसेच सहकारी संस्थांमधून ठराव करून सरकारकडे पाठवण्याचा निर्णयही यावेळी एकमताने करण्यात आला.
शक्तिपीठ महामार्गाबाबत सर्व पक्ष आणि संघटनांची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘शक्तिपीठविरोधी संघर्ष समिती’तर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या व्यासपीठावरून आपली ठाम भूमिका मांडली.
जयंत पाटील पुढे म्हणाले, “गरज नसताना उभारला जाणारा हा महामार्ग वाळवा तालुक्यातील गावांना विभक्त करणार आहे. तालुक्यावर आलेले हे मानवनिर्मित संकट परतवून लावण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मला रस्त्यावर उतरावे लागेल. सरकारने शेतकऱ्यांची मागणी नसताना अशा प्रकल्पांवर खर्च करण्यापेक्षा गावांना जोडणारे रस्ते, पाणंद रस्ते आणि स्थानिक गरजांवर निधी खर्च करावा.”
माजी खासदार राजू शेट्टी यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. “शक्तिपीठ प्रकल्पाला माझा सुरुवातीपासून विरोध आहे आणि तो कायम राहणार आहे. कर्ज काढून, पर्यावरणाचा ऱ्हास करून आणि शेती उद्ध्वस्त करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. नागपूर–रत्नागिरी महामार्गाला समांतर हा मार्ग केवळ भ्रष्टाचारासाठीच उभारला जात आहे. या प्रकल्पातून ५० ते ६० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा घाट घातला जात आहे. ठेकेदारांना पोसण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी आम्ही जाऊ देणार नाही,” असा आरोप त्यांनी केला.
कॉ. भारत पाटणकर यांनी संघर्षाची परंपरा अधोरेखित करताना सांगितले, “हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. अन्याय सहन करण्याची परंपरा येथे नाही. महामार्गासाठी शेतीची मोजणीच होऊ देऊ नका. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची नेमकी काय समृद्धी होणार आहे, हे सरकारने स्पष्ट करणे आवश्यक होते.”
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनीही या प्रकल्पामागील हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हा महामार्ग केवळ भ्रष्टाचारासाठी राबवला जात आहे. सर्व काही काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी चालले आहे. काही शेतकरी जास्त मोबदल्याच्या अपेक्षेने या प्रकल्पाचे स्वागत करत असतील, तर त्यामागील परिणामांचाही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनीही या प्रकल्पाची गरज विचारात घेतली पाहिजे, असे सांगितले. “जिल्ह्यात आणि तालुक्यात यापूर्वीच अनेक मोठे मार्ग उभारले गेले आहेत. मग पुन्हा या नव्या महामार्गाची गरज काय? आपण सर्वांनी एकजुटीने हा लढा शेवटपर्यंत नेला पाहिजे,” असे ते म्हणाले.
या मेळाव्यात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, काँग्रेसच्या डॉ. जोत्स्ना पाटील, आरपीआयचे सचिन जाधव, आम आदमी पक्षाचे गजानन पाटील, दलित महासंघाचे शंकर महापुरे, प्रहार संघटनेचे दिग्विजय पाटील आदी मान्यवरांनीही आपली मते मांडली.
कार्यक्रमाची सुरुवात शामराव पाटील यांच्या स्वागताने झाली. बी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर दीपक कोठावळे आणि सुहास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा समारोप कॉ. धनाजी गुरव यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या