प्रतिष्ठा न्यूज | पुणे
बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत नवा इतिहास घडवला आहे. तब्बल २ लाख १८ हजार ९३० मताधिक्याने त्यांनी एकतर्फी विजय मिळवला असून, देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेशमधील साहिबाबाद मतदारसंघातून सुनील कुमार शर्मा यांनी २०२२ च्या निवडणुकीत २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. तो विक्रम आता सुनेत्रा पवार यांनी मागे टाकला आहे.
बारामती पोटनिवडणुकीत एकूण ५८.१७ टक्के मतदान झाले. प्रमुख राजकीय पक्षांचा उमेदवार मैदानात नसल्याने महायुतीकडून मोठ्या मताधिक्याचा अंदाज वर्तवला जात होता, जो प्रत्यक्षातही खरा ठरला.
याशिवाय, बारामतीतील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रमही सुनेत्रा पवार यांनी मोडीत काढला. यापूर्वी हा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांनी २०१९ मध्ये गोपीचंद पडळकर यांचा १ लाख ६५ हजार २६५ मतांनी पराभव केला होता.
या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर एकूण २२ उमेदवार होते. मात्र, कोणताही प्रमुख पक्ष रिंगणात नसल्याने लढत एकतर्फी झाली. उर्वरित सर्व उमेदवारांना मिळून केवळ ४,८३७ मते मिळाली.
२०२२ मध्ये सुनील कुमार शर्मा – २,१४,८३५ मताधिक्य
२०२६ बारामती पोटनिवडणूक – सुनेत्रा पवार – २,१८,९३० मताधिक्य
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या