सांगली प्रतिनिधी : मिरज तालुका व परिसरातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या वारंवार लोडशेडिंग, अनियमित वीजपुरवठा व कमी दाबाच्या समस्येमुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला असून, या समस्या तातडीने दूर करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गट व इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सांगली विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या शेती हंगाम सुरू असताना पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात सततची वीज कपात तसेच रात्री-अपरात्री दिला जाणारा वीजपुरवठा यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
दिवसभर वीज नसल्याने मोटारपंप बंद राहतात. परिणामी ऊस, भाजीपाला, फळबाग तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रात्री उशिरा वीज आल्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत असून, सर्पदंश, अपघात तसेच वन्य प्राण्यांचा धोका वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय कमी दाबामुळे मोटारी जळणे, ट्रान्सफॉर्मर निकामी होणे अशा समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनियमित लोडशेडिंग तातडीने बंद करावे, शेतीपंपासाठी नियमित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, दिवसातील ठराविक वेळेत वीज देण्याचे नियोजन करावे, खराब ट्रान्सफॉर्मर व विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी तसेच वीजपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्वसूचनेसह उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना नेते मोहन वनखंडे, विजय तात्या पाटील, विलास देसाई, चंद्रकांत मैंगुरे, इस्माईल कुरणे, प्रदीप सावंत, अजित शेजुळ, तुषार खांडेकर, संजय लिबींकाई, श्रीकांत पाटील, संजय देसाई, रंगराव सकपाळ, समशेर नदाफ, डॉ. अमोल कोळी, मनोहर होनमोरे, कपिल कबाडगे, नेमिनाथ शेडबाळे, प्रदीप पुजारी, मोहन शिंदे, सौरभ मोरे, विद्याधर कांबळे, प्रतीक संकपाळ, महावीर मंगसुळे, अमोल थोरवे, कृष्णात झेंडे, ओंकार नलावडे, कपिल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या