गगनबावडा : जंगलातील अन्न-पाण्याच्या तुटवड्यामुळे वन्यप्राण्यांनी आता आपला मोर्चा थेट मानवी वस्त्यांकडे वळवला आहे. गगनबावडा तालुक्यात सध्या गवा आणि बिबट्या यांसारख्या वन्यप्राण्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. कालच साखरी येथे एका गव्याने गरीब दाम्पत्यावर केलेला जीवघेणा हल्ला तालुक्याची भयानक परिस्थिती अधोरेखित करतो. या पार्श्वभूमीवर, "वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कधी होणार?" असा संतप्त सवाल गगनबावडा तालुक्यातील नागरिक उपस्थित करीत आहेत. तालुक्यात भीतीचे गडद वातावरण असताना, वन विभाग मात्र केवळ कागदी घोडे नाचविण्यातच मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे.
झुडपामागे दबा धरून बसलेल्या गव्याचा अचानक हल्ला
साखरी येथील रहिवासी सोनाबाई दत्तात्रय कांबळे व दत्तात्रय शंकर कांबळे हे गरीब दाम्पत्य रोजगारासाठी नजीकच्या जंगल परिसरात करवंदे गोळा करण्यासाठी गेले होते. दरम्यान, झुडपामागे दबा धरून बसलेल्या एका पिसाळलेल्या गव्याने अचानक सोनाबाई यांच्यावर जोरदार हल्ला केला. महिलेच्या किंकाळ्या आणि आरडाओरडीनंतर पती दत्तात्रय कांबळे मदतीसाठी धावले असता, गव्याने त्यांच्यावरही हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि मोठ्या हिमतीने गव्याला हाकलून लावले. जखमी दाम्पत्याला तत्काळ कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण साखरी परिसर, व तालुक्यात दहशतीचे सावट पसरले आहे.
पिकांचा फडशा; शेतकरी संकटात
जंगलात प्राण्यांचा वावर कमी होऊन गव्यांचा खेड्यांकडे आणि शेतजमिनींकडे वावर वाढला आहे. गवा ऊस, बागायत पिकांसह अन्य हिरव्या पिकांचा प्रथम फडशा पाडतो. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
गुंठ्याला ५२५ रुपये! शासनाचे गणित अजब आणि अनाकलनीय
गगनबावडा तालुक्यासाठी शासनाकडून मिळणारी पिकांची नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. गुंठ्याला अवघे ५२५ रुपये देणे म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या भागात गव्यांचा वावर अधिक, तेथे नुकसानभरपाईची रक्कम कमी, असे शासनाचे अजब आणि अनाकलनीय गणित पहायला मिळत आहे.
वन विभाग वारंवार नुकसानभरपाई दिल्याचा दावा करत असला, तरी 'नुकसान होऊच नये' यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक जबाबदाऱ्या टाळत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. शासनाने आणि वनविभागाने केवळ पंचनामे न करता तारेचे कुंपण घालणे, चर खोदणे, जंगलात पाणवठे निर्माण करणे यांसारख्या मूलभूत उपाययोजनांवर विचार करणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागण्या; तात्काळ मदतीची हाक
शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर आलेल्या या गंभीर संकटाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणाऱ्या निवेदनाची तालुक्यात चर्चा आहे. वनविभागाने या गरीब कांबळे कुटुंबाला तात्काळ वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत द्यावी, परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी, अशा ठाम मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. वन विभागाने वेळीच पावले न उचलल्यास गगनबावड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
" रात्रीच्या वेळी गवे कळपाने शेतामध्ये घुसतात. उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे."
" प्राणी गावात येऊन शेतकऱ्यांच्या जीवावर उठतात, असेही प्रकार घडलेले आहेत. आम्हाला बंदुकीची परवाना द्या आम्ही जंगलात जाऊन त्यांच्या जीवावर उठतो."
— बाळासाहेब जाधव (शेतकरी, भूतलवाडी -सैतवडे)
शासन व वन विभागाने गव्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नुकसानभरपाई तुटपुंजी देऊन तालुक्यावर जो अन्याय केला आहे, त्याबाबत आम्ही लवकरच तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत."
— दत्तात्रय वारिक, कृष्णात यादव (शेतकरी, सांगशी)
" गगनबावडा तालुक्यासाठी नुकसानभरपाईची मिळणारी रक्कम तुटपुंजी आहे, हे मान्य असून शेतकऱ्यांनी शासनाकडे अधिक पाठपुरावा करणे जरुरीचे आहे."
— धनाजी पाटील, संग्राम पाटील
(वनरक्षक, वनखाते, गगनबावडा)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या