सांगली : लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. नागनाथ दत्तू बनसोडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कृतज्ञता व स्नेहमेळावा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. संस्थेच्या स्व. अँड. केशवराव आप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मा. शांतिनाथ कांते होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाळासाहेब कोटलगी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. बनसोडे हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हितचिंतक, सहकारी, विद्यार्थी, खेळाडू, प्रशासकीय कर्मचारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रकाश मनगिरे, मा. रविंद्र बुडूख, मा. भीमाशंकर बनसोडे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील तसेच महसूल विभागाचे अप्पर सचिव मा. संजय धारूरकर उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. बी. व्ही. पाटील यांनी अध्यक्ष मा. शांतिनाथ कांते यांचा सत्कार केला.
महाविद्यालयाच्या वतीने प्रा. नागनाथ बनसोडे व त्यांच्या सौभाग्यवतींचा यथोचित सत्कार अध्यक्ष मा. कांते आणि प्राचार्य डॉ. बी. व्ही. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संस्था, महाविद्यालय व सेवक पतसंस्थेच्या वतीने बनसोडे दांपत्य व त्यांच्या कुटुंबीयांचाही गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक व उच्चपदस्थ खेळाडूंचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी प्रा. बनसोडे यांच्या कार्याचा गौरव केला. तामिळनाडू येथील त्यांचे गुरुवर्य प्रा. व्ही. तिरुपती यांनी पाठविलेल्या संदेशात “राजा” असा उल्लेख करत विद्यार्थी जीवनापासूनच ते उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असल्याचे सांगितले. प्रसिद्ध उद्योजक रविंद्र बुडूख यांनी विद्यार्थी दशेपासूनच बनसोडे सरांना मदत व सहकार्य केल्याच्या आठवणी सांगितल्या. प्रा. मनोज हेदे यांनी “राजा हा माझ्या जीवाभावाचा मित्र आहे” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रा. बनसोडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. आपल्या मनोगतात प्रा. बनसोडे यांनी कौटुंबिक संघर्ष, क्रीडाप्रेम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यांचा भावनिक उल्लेख केला. “खेळाडू आणि विद्यार्थी हेच माझे प्राण आहेत,” असे सांगत त्यांनी सेवाकाळातील अनुभव मांडले.
अध्यक्षीय भाषणात मा. शांतिनाथ कांते यांनी प्रा. बनसोडे यांनी विद्यार्थी व खेळाडू घडविण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करत, सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी क्रीडा क्षेत्रात योगदान द्यावे, अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास बार्शी येथील शिक्षक, मित्र, माजी विद्यार्थी, विद्यापीठ पदाधिकारी, पत्रकार, कुटुंबीय व विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक अशा सुमारे ४०० ते ५०० मान्यवरांची उपस्थिती होती. संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रा. बनसोडे यांनी संस्थेला ७५ हजार रुपयांचा देणगी धनादेश चेअरमन मा. शांतिनाथ कांते यांच्याकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाची सांगता सत्कार समितीचे निमंत्रक डॉ. राजू सावंत यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. जहांगीर ताबोळी, प्रा. किशोर चंदूरे, डॉ. एस. डी. पाटील, प्रा. डॉ. गणेश सिंहासने, डॉ. महादेव सूर्यवंशी, श्री. शिवाजी घोरपडे, श्री. अविनाश गव्हाणे व श्री. सुनील कवठेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या