प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने कडक भूमिका घेतली असून, खताचे लिंकिंग तसेच भेसळयुक्त व बोगस बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांनी दिला.
तासगाव येथील पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अरुणाताई पाटील होत्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील, शशिकांत जमदाडे, पंचायत समिती सदस्य तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.बैठकीत आगामी खरीप हंगामाचे नियोजन सविस्तरपणे मांडण्यात आले. शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे व खते वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी विक्रेत्यांनी आधीच नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारचे खत लिंकिंग, जबरदस्ती विक्री किंवा बनावट बियाण्यांची विक्री आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी गतवर्षीच्या पीक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कृषी विभाग, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्या समन्वयातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.एकंदरीतच, खरीप हंगाम सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या