प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव तहसील कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठक अधिकाऱ्यांच्या बेफिकीरीमुळे वादाच्या केंद्रस्थानी आली असून, “आमदारांचा प्रशासनावर अंकुशच राहिला नाही का?” असा सवाल आता उघडपणे उपस्थित होऊ लागला आहे. जबाबदार विभागप्रमुख अधिकारी गैरहजर राहिल्याने संतप्त आमदार रोहित पाटील यांनी बैठक सुरू होण्यापूर्वीच वॉकआऊट करत प्रशासनाला जोरदार फटकारले.
सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजित बैठकीसाठी आमदार पाटील तहसील कार्यालयात दाखल झाले.दालनात पोहोचल्यावर बैठकीसाठी बोलावलेले बहुतांश वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले.मान्सून तोंडावर असताना पाणीपुरवठा, आरोग्य, वीज आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ कनिष्ठ कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहून आमदारांचा संताप अनावर झाला.
“अधिकारीच उपस्थित नसतील,तर बैठकीचा उपयोग काय? हा प्रशासनाचा निष्काळजीपणा नव्हे तर जनतेशी अन्याय आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
काही काळ प्रतीक्षा करूनही जबाबदार अधिकारी न आल्याने अखेर आमदार पाटील यांनी बैठक सोडण्याचा निर्णय घेतला.यावेळी त्यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा देत, “अशी बेफिकीरी सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश दिला.
गैरहजर अधिकाऱ्यांची लांबलचक यादी...
या महत्त्वाच्या बैठकीस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लेंडवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पशुधन विकास अधिकारी, महावितरणचे सहायक अभियंता, दुय्यम निबंधक, गटशिक्षणाधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच पोलिस निरीक्षक आदी अधिकारी गैरहजर राहिल्याने बैठकीचा पूर्णपणे फज्जा उडाला.
अंकुश सुटल्याने प्रशासन बेलगाम?
मान्सूनपूर्व तयारीसारख्या गंभीर विषयावर अधिकाऱ्यांची अशी अनुपस्थिती प्रशासनातील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. आमदार उपस्थित असतानाही अधिकारी गैरहजर राहतात, ही बाब प्रशासनावरचा अंकुश ढिला झाल्याचेच द्योतक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
तासगावातील या प्रकारामुळे आता प्रशासनातील जबाबदारी ठरवली जाणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या