सांगली प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी माधव नगर करमाळा रोडवर गावठी हातभट्टी दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत ७५० लिटर गावठी हातभट्टी दारूचे कच्चे रसायन तसेच इतर साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. एकूण ३१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकाने माधवनगर परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, माधवनगर ते कर्नाळ मार्गावरील एस.सी. सीड्स अँड फूड्स फॅक्टरीच्या उत्तरेस ओढ्यालगत काही इसम गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाड टाकली. पोलीसांची चाहूल लागताच तेथील दोन संशयित इसम पळून गेले.
त्यानंतर परिसराची तपासणी केली असता जमिनीत पुरून ठेवलेले लोखंडी बॅरल आढळून आले. त्यामध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ७५० लिटर कच्चे रसायन साठवलेले होते. तसेच रिकामे लोखंडी बॅरल, लोखंडी डबे, लोखंडी कॉइल आणि कोळशाची पोती असा एकूण ३१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या या रसायनांचे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित सर्व साहित्य जेसीबीच्या सहाय्याने जमिनीतून बाहेर काढून जागीच नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी नितेश कुंभार मारवाडी व संजय कुंभार मारवाडी (दोघे रा. कंझारभाट वस्ती, कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ६५ (बी), ६५ (सी), ६५ (डी), ६५ (ई) व ६५ (एफ) नुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच पोलीस अंमलदार अनिल कोळेकर, अतुल माने, महादेव नागणे, संदीप पाटील, विक्रम खोत, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते व श्रीधर बागडी यांच्या पथकाने केली.
जिल्ह्यात गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या