प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानतर्फे “स्वतंत्रते भगवती” हा सावरकरांच्या गीतांवर आधारित भव्य आणि बहारदार सांगीतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सांगलीतीलच गुणी कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून सावरकरांचे क्रांतिकारी जीवनकार्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे उलगडून दाखविण्यात आला.
कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारलेल्या गीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक सादरीकरणाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत कलाकारांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे निवेदन दीपक पाटणकर यांनी अतिशय प्रभावी आणि ओजस्वी शैलीत केले. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. गायक श्रीरंग जोशी, श्रीनिवास हसबनीस, उर्वी मराठे, समिता सांभारे, स्वराली सांभारे तसेच केदार सांभारे आणि वादक कलाकारांनी सूर, ताल आणि वाद्यांच्या सुंदर संगमातून उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले.
कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनपटाचे दर्शन घडविणारा आकर्षक स्टेजमागील पडदा हा विशेष आकर्षणाचा विषय ठरला. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि राष्ट्रकार्याचे प्रभावी चित्रण असलेल्या या देखण्या पार्श्वभूमीमुळे संपूर्ण सभागृह देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेले होते.
कार्यक्रमाचा समारोप संस्थेच्या ध्येयमंत्राने आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आरतीने भक्तीमय वातावरणात करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अशा प्रकारचे वैचारिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. समाजामध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार आणि सावरकरांचे विचार रुजविण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, या उपक्रमांना नागरिकांचाही मोठा प्रतिसाद लाभत आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष विजय नामजोशी, कार्यवाह सुनील देशपांडे तसेच सर्व संचालक मंडळाने केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या