प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी “प्रधानमंत्री आवास योजना – सर्वांसाठी घर २०२२” अंतर्गत तासगाव नगरपरिषदेकडून वितरित करण्यात आलेल्या निधीची आता संबंधित लाभार्थ्यांकडून वसुली सुरू होणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी शासनाकडून निधी घेऊनही घरकुलाचे बांधकाम सुरू केले नाही, अशा लाभार्थ्यांवर नगरपरिषदेने कठोर भूमिका घेतली आहे.
तासगाव नगरपरिषदेकडून वैयक्तिक स्वरूपातील बांधकाम (BLC) नवीन बांधकाम या घटकाअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यात आला होता. मात्र अनेक लाभार्थ्यांनी निधी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.यामुळे शासन स्तरावरून अशा लाभार्थ्यांचा लाभ रद्द करण्यात आला असून, त्यांना प्राप्त झालेला निधी आता व्याजासह परत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी दि. १५ जून २०२६ अखेरपर्यंत नगरपरिषद कार्यालयात निधी जमा करावा, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शासनाच्या निधीचा गैरवापर सहन केला जाणार नाही. मुदतीत रक्कम न भरल्यास शासकीय थकबाकीप्रमाणे वसुली प्रक्रिया राबवण्यात येईल.या निर्णयामुळे शहरातील संबंधित लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून,आता अनेक जण नगरपरिषद कार्यालयात धाव घेत असल्याचे चित्र आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या