सांगली दि. २५:आज राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांची भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी भेट घेऊन सांगली, सातारा व कोल्हापूर कार्यक्षेत्रातील तीन आसनी प्रवासी रिक्षा परवान्यावर पूर्वीप्रमाणेच तीनही जिल्ह्यांची नोंद कायम ठेवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. याप्रकरणी मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली आणि मा. परिवहन आयुक्तांना तपासून पुढील कार्यवाही करण्याचा आदेश दिला.
सांगलीपासून अवघ्या ४ कि.मी.वर कोल्हापूर जिल्ह्याची हद्द सुरु होते. तर कासेगावपासून ३ कि. मी. वर सातारा जिल्हा व मिरज शहरापासून ७ कि. मी. वर कर्नाटक राज्य सुरु होते. मिरज ही आरोग्य पंढरी आहे. त्यामुळे दररोज तिन्ही जिल्ह्यातील रुग्ण मिरजेत उपचारासाठी परवडणाऱ्या तीन आसनी रिक्षाने जिल्हातंर्गत ये-जा करतात. तसेच तिन्ही जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी भाविक तसेच छोटे व्यावसायिक व विद्यार्थीही जिल्हातंर्गत रिक्षानेच मोठ्या संख्येने ये-जा करतात. अलिकडे
रिक्षा परवाना नोंदीत फक्त एका जिल्ह्याची नोंद असल्याने अन्य जिल्ह्यातील वहातूक पोलीस व आरटीओ कडून रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते त्यामुळे हकनाक रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.पृथ्वीराज पाटील यांनी ही बाब परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी मंत्रीमहोदयांनी लवकरात लवकर रिक्षा चालक आणि परिवहन प्रशासन यांची बैठक घेऊन उचित निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली आहे.अशी माहिती भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या