प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार सध्या पूर्णपणे ढेपाळल्याचे चित्र असून, नागरिक आणि शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. “साहेब, आमचं काम तेवढं करा हो... लई दिवस झालेत... दहा हेलपाटे घातलेत, पण तुम्ही भेटत नाही,” अशी विनवणी नागरिकांना कार्यालयात करावी लागत असल्याचे संतप्त चित्र सध्या पाहायला मिळत आहे.भूमी अभिलेख कार्यालयात मयत व्यक्तींची नावे कमी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी टाकणे, फेरफार, मोजणी यांसारखी अत्यंत महत्त्वाची कामे महिनोनमहिने प्रलंबित राहत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.साध्या नोंदीसाठीही दोन-दोन ते तीन-तीन महिने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे.कार्यालयातील जे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत त्यांपैकी अनेकजण नियमित उपस्थित राहत नसल्याची तक्रार आहे.कार्यालयात गेल्यानंतर “साहेब बाहेर गेले आहेत”, “मोजणीला गेले आहेत”, “आज आलेले नाहीत” अशीच उत्तरे नागरिकांना दिली जातात.अनेक कर्मचार्यांचे मोबाईलही कायमस्वरूपी बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या आशेने आणि खर्च करून कार्यालयात येतात.मात्र संबंधित अधिकारी किंवा कर्मचारीच उपलब्ध नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते.काही वेळा उपस्थित कर्मचारी जबाबदारी झटकून इतर कर्मचार्यांकडे बोट दाखवत असल्याने सामान्य नागरिकांची प्रचंड फरफट होत आहे.कार्यालयातील उपस्थिती, अनुपस्थिती आणि कामकाजावर वरिष्ठांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “हे कार्यालय नेमकं चालतंय तरी कोणाच्या भरोशावर?” असा सवाल आता जोर धरू लागला आहे.भूमी अभिलेख कार्यालयाच्या या ढिसाळ आणि बेफिकीर कारभारामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत आहेत.संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कार्यालयातील अनियमिततेची चौकशी करावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या