पारंपरिक खेळांची परंपरा जपत आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन करत श्री विठ्ठल क्रांती सोंगट्या मंडळ, सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोंगट्या स्पर्धेला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यातील तब्बल ५४ संघांनी सहभाग घेत स्पर्धेची रंगत वाढवली. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात श्री अंबाबाई बेडग संघाने दमदार खेळी करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेत ओल्ड गर्जना कवठेपिरान संघाने द्वितीय, जय जिनेंद्र नांद्रे संघाने तृतीय तर नागराज सोंगट्या मंडळ, मिरज संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला.
तरुण भारत स्टेडियमच्या बॅडमिंटन हॉल येथे शनिवार व रविवारी या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. उद्घाटनप्रसंगी नगरसेवक युवराज बावडेकर, स्वीकृत नगरसेवक केदार खाडिलकर, नगरसेवक उदय बेलवलकर, संदीप कुकडे, अविनाश मोहिते, विश्वेश्वर मगदूम, मुकुंद मोहिते, मिलिंद बाबर आणि सुभाष आरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी पारंपरिक खेळांचे जतन करत युवा पिढीमध्ये त्याबद्दलची आवड निर्माण होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या स्पर्धेची परंपरा १९८० सालापासून सुरू असून काही काळ स्पर्धा बंद होती. मात्र २०१२ साली सचिन मोहिते, सुभाष कदम आणि अशोक ऐनापुरे यांनी पुढाकार घेत स्पर्धेला नवसंजीवनी दिली. सुरुवातीला २५ ते ३० संघ सहभागी होत असताना आज या स्पर्धेचा विस्तार राज्याच्या सीमाबाहेर पोहोचला असून कोल्हापूर व कर्नाटकातील संघांचाही मोठा सहभाग दिसून आला.
सांगली, नांद्रे, कवठे एकंद, कवठेपिरान, दुधगाव, सावळी, मैशाल, आरग, बेडग, कसबे डिग्रज या भागांसह कोल्हापूर आणि कर्नाटकातील निलजी, अक्कोळ, जमखंडी येथील संघांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच कोल्हापूरमधील कदम वॉरियर्स, सरदार तालीम आणि खंडोबा तालीम या संघांनी सहभाग घेत स्थानिक संघांना कडवी टक्कर दिली.
स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक सामन्यात खेळाडूंचा आत्मविश्वास, डावपेच आणि संयम पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ आजही लोकांच्या मनात तितकाच जिवंत असल्याचे चित्र या स्पर्धेतून दिसून आले.
स्पर्धा यशस्वी आणि विनाविवाद पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र सोंगटी फेडरेशनच्या पंचांनी मोलाचे सहकार्य केले. आयोजकांनी भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला.
या स्पर्धेसाठी सुभाष कदम, सचिन मोहिते, विनायक उबारे, सुशांत कदम, आदित्य मोहिते, वासीम बागवान, रविंद्र जौजाळ, सिद्धार्थ चिंचकर, महेश तेली यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या