गगनबावडा : दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नुकतीच आपल्या सहकुटुंबासह पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक, भौतिक व विकासात्मक उपक्रमांची अत्यंत आस्थेने पाहणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत पत्नी गीतादेवी प्रतापसिंह जाधव, स्नुषा तथा डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता योगेश जाधव, कन्या शितलताई पाटील व इतर कुटुंबीय उपस्थित होते.
संस्थेकडून उत्साही स्वागत व प्रगतीचा आढावा
महाविद्यालय परिसरात आगमन होताच मान्यवरांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी संस्था सातत्याने कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधांची पाहणी
भेटीदरम्यान पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी महाविद्यालयातील विविध विभाग, अत्याधुनिक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांची बारकाईने पाहणी केली. तसेच महाविद्यालयात नुकताच पूर्ण झालेला आरसीसी रस्ता, साकव (पूल) आणि नव्याने उभारण्यात आलेल्या आरसीसी इमारतीचीही त्यांनी पाहणी करून विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले.
दीर्घकालीन 'मास्टर प्लॅन' आवश्यक: डॉ. प्रतापसिंह जाधव
महाविद्यालयाच्या एकूणच प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी भावी वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले,
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांसह स्पर्धात्मक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावत असतानाच भौतिक सुविधाही तितक्याच सक्षम असणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संस्थेने दीर्घकालीन 'मास्टर प्लॅन' तयार करावा."
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा तर उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी यांनी विविध विद्यार्थी कल्याणकारी उपक्रमांचा आढावा मांडला.
या कार्यक्रमाला डॉ. एस. एस. कांबळे, सरपंच मानसी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे, स्थानिक ग्रामस्थ, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या या सदिच्छा भेटीमुळे महाविद्यालयाच्या भावी विकासाला एक नवी दिशा आणि मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या