प्रतिष्ठा न्यूज | जत प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान भीषण दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे बांधकाम सुरू असलेली कच्ची भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू झाला, तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. मंगळवार, १२ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. दरम्यान परिसरात अचानक तुफान वादळी वारा सुरू झाला. स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक भाविकांनी जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या कच्च्या भिंतीशेजारी आसरा घेतला होता.
काही वेळातच वाऱ्याचा वेग आणखी वाढला. शेजारील पत्र्याचे शेड उडून त्या भिंतीवर आदळले आणि भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत ढिगाऱ्याखालून जखमी व मृतांना बाहेर काढले.
या भीषण दुर्घटनेत ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये काही मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात एकच शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या