प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नागरिक आणि शेतकऱ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांना जलद गतीने मार्गी लावण्यासाठी महसूल प्रशासनाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा-१” अंतर्गत तासगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता तासगाव-विटा रोडवरील अमीर मल्टीपर्पज हॉल येथे पार पडणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींची जनजागृती, डिजिटल सेवांचा प्रसार आणि नागरिकांच्या महसुली अडचणी एकाच ठिकाणी सोडविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामध्ये शेतकरी व नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.शिबिरात लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण, फेरफार प्रकरणांतील कमी-जास्त पत्रकांची तपासणी, सातबारा दुरुस्ती, “जिवंत सातबारा” मोहिमेअंतर्गत नोंदींची कार्यवाही, डिजिटल सातबारा जनजागृती, अकृषक तरतुदींबाबत मार्गदर्शन, ई-मोजणी सेवा, अंगीकृत टंचाई नोंदणी, पीएम किसान योजनेसंदर्भातील कामे तसेच तक्रार निवारण अशा विविध सेवा दिल्या जाणार आहेत.महसूल प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने मिळणार असून तासगाव तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या