शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेकदा “साहेब बैठकीला गेले आहेत”, “दौऱ्यावर आहेत” किंवा “आज कार्यालयात नाहीत” अशी कारणे ऐकावी लागतात. मात्र, संबंधित अधिकारी खरोखरच अधिकृत कामासाठी बाहेर आहेत की विनानोंद अनुपस्थित आहेत, हे पडताळून पाहण्याचा अधिकार आता नागरिकांकडे आहे. यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात ठेवण्यात येणारे ‘हालचाल रजिस्टर’ (Movement Register) महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जाण्याची वेळ, बाहेर जाण्याचे कारण, परत येण्याची अपेक्षित वेळ तसेच स्वाक्षरी यांची नोंद असलेले हालचाल रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे. अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्यास नागरिकांना हे रजिस्टर पाहण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे.
नागरिकांनी काय करावे?
अधिकारी कार्यालयात नसल्याचे सांगितल्यास संबंधित हालचाल रजिस्टरची मागणी करून त्यातील नोंदी तपासाव्यात. अधिकारी कोणत्या कामासाठी व किती वाजता बाहेर गेले, याची स्पष्ट नोंद आहे का हे पाहणे आवश्यक आहे. जर कोणतीही नोंद नसताना अधिकारी अनुपस्थित आढळले, तर ती अनधिकृत गैरहजेरी मानली जाऊ शकते.
अशा प्रकरणात नागरिक संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीद्वारे तक्रार दाखल करू शकतात. प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी हालचाल रजिस्टर प्रभावी साधन ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
पारदर्शक प्रशासनासाठी जनजागृती गरजेची
हालचाल रजिस्टर हा केवळ कार्यालयीन दस्तऐवज नसून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारे प्रभावी साधन आहे. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत पारदर्शकता निर्माण होऊन नागरिकांचा वेळ व होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनीही विनम्र पण ठामपणे आपल्या हक्कांची जाणीव ठेवून या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
“जागरूक नागरिक आणि उत्तरदायी प्रशासन” या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या