प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मुंबई : शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना दिनांक ११ मे २०२६ पासून प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया https://mahafyjcadmissions.in
या अधिकृत संकेतस्थळावर राबविण्यात येत आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने इयत्ता १० वीचा निकाल ८ मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यापूर्वी १० एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा देण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातील तब्बल ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे.
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा तीन नियमित प्रवेश फेऱ्या, ‘ओपन टू ऑल’ चौथी फेरी तसेच मुलींसाठी विशेष पाचवी फेरी आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत पोर्टलवर उपलब्ध सूचना, माहिती व वेळापत्रक काळजीपूर्वक पाहून ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठीच्या शून्य फेरी तसेच नियमित कॅप फेरी क्रमांक १ चे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले असून प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व अद्ययावत माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेला व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या