प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहरातील एका कार्यालयाजवळील चौकात अघोरी पद्धतीने पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे.शहरातील दोन युवकांचे फोटो ठेवून त्यावर लिंबू, हळद, कुंकू, नारळ, टाचण्या आदी साहित्य वापरून ही अघोरी पूजा करण्यात आल्याचे दिसून आले.समृद्धी कार्यालय परिसर हा नेहमी नागरिकांच्या वर्दळीचा भाग असून, सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी हा प्रकार अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.शहरात काही भोंदूबाबा किंवा स्वतःला देवी-देवतांची शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करणाऱ्या महिला अशा प्रकारचे अघोरी प्रकार करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अंधश्रद्धा वाढवून समाजामध्ये भीती निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.या प्रकरणी राष्ट्रीय पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष टिपूभाई पटवेगार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “शहरात अघोरी पूजा करून नागरिकांमध्ये दहशत आणि अंधश्रद्धा पसरविणाऱ्या भोंदूबाबा व महिलांचा तात्काळ शोध घेऊन पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. अन्यथा राष्ट्रीय पँथर सेना तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा दिला आहे.दरम्यान,या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तपास सुरू करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या