प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या दैनंदिन महसुली अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा १” अंतर्गत तासगाव तालुक्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दि. ८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता, जिल्हा परिषद शाळा क्र. १, विसापूर (ता. तासगाव) येथे पार पडणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महसूल विभागाशी संबंधित सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी विविध महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत दाखले वितरण, भूसंपादन प्रकरणातील नोंदी अद्ययावत करणे, सातबाऱ्यावरील चुका दुरुस्त करणे, वारस नोंद, नोंदी कमी-जास्त करणे, ई-नोंदणी, डिजिटल सातबारा जनजागृती, अडचणींवर मार्गदर्शन, ई-मोजणी सेवा, अंबी स्टॅक नोंदणी, पीएम किसान योजनेशी संबंधित कामे तसेच तक्रार निवारण यांचा समावेश आहे.
शासनाच्या योजना आणि सेवा पारदर्शक व जलद पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, तासगाव तालुक्यातील सर्व नागरिक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या