प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :जिद्द,मेहनत आणि न डगमगणाऱ्या आत्मविश्वासाच्या जोरावर सांगलीच्या यश खंडागळेने जागतिक क्रीडा क्षेत्रात इतिहास रचला आहे. इजिप्तमधील इस्मालिया येथे सुरू असलेल्या कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४ मे २०२६ रोजी यशने ७१ किलो वजनी गटात १४० किलो स्नॅच आणि १६९ किलो क्लीन अँड जर्क अशी एकूण ३०९ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले. या कामगिरीमुळे भारताला या स्पर्धेत पुरुष गटात मिळालेले हे पहिलेच रौप्यपदक ठरले असून, यशने देशासाठी ऐतिहासिक पराक्रम नोंदवला आहे.याआधी भारतीय पुरुष खेळाडूंना केवळ कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यशच्या या यशाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याच्या या कामगिरीने केवळ सांगलीच नव्हे, तर संपूर्ण देश अभिमानाने भरून गेला आहे.
यश खंडागळे हा सांगलीतील दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटचा अत्यंत शिस्तबद्ध आणि मेहनती खेळाडू आहे. प्रशिक्षक मयूर सिंहासने यांच्या कठोर मार्गदर्शनाखाली त्याने स्वतःला घडवले. रोजचा कडक सराव, योग्य तंत्र, वजन वाढवण्याची वैज्ञानिक पद्धत आणि मानसिक तयारी यांचा संगम साधत त्याने आपली कामगिरी उंचावली.त्याचा प्रवास मात्र सोपा नव्हता. सकाळ-संध्याकाळ दुहेरी सराव, सण-उत्सवांपासून दूर राहणे, मित्रपरिवारापासून अलिप्त राहून पूर्ण लक्ष खेळावर केंद्रित करणे—या सर्व त्यागांमुळेच आज हे यश शक्य झाले. वेटलिफ्टिंगसारख्या कठीण खेळासोबत शिक्षणाचा समतोल राखणेही त्याच्यासाठी मोठे आव्हान होते. केडब्ल्यूसी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सराव, परीक्षा आणि अभ्यास यांचा ताळमेळ साधत त्याने आपली वाटचाल सुरू ठेवली.घरची परिस्थिती साधी असूनही यशने कधीही अडचणींना शरणागती पत्करली नाही. वडील विनोद खंडागळे यांच्या छोट्या हेअर कटिंग सलूनमध्ये वेळ मिळेल तेव्हा मदत करत, तर दुसरीकडे स्वतःच्या स्वप्नांसाठी घाम गाळत राहिला. आई-वडिलांनीही त्याच्या यशासाठी अनेक त्याग केले.
या प्रवासात दुखापतींनीही त्याची परीक्षा घेतली. हात फाटणे, खांद्यावर ताण, गुडघ्यांमध्ये वेदना—अशा अनेक संकटांवर मात करत तो पुन्हा उभा राहिला. कधी रक्तबंबाळ हातांनी बार पकडला, तर कधी तीव्र सरावामुळे शरीर थकून गेले, तरीही त्याने हार मानली नाही. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रिकव्हरी, फिजिओथेरपी आणि विश्रांती यांचा वापर करत त्याने स्वतःला अधिक सक्षम बनवले.वेटलिफ्टिंगमध्ये यशासाठी योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. यशने आपल्या डाएटवर काटेकोर नियंत्रण ठेवत प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि आवश्यक पोषणमूल्यांचा समतोल राखला. सराव, आहार आणि विश्रांती यांचा योग्य संगम साधत त्याने आपल्या शरीराला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास तयार केले.आंतरराष्ट्रीय वजनी गटांमध्ये झालेल्या बदलांमुळे त्याला काही स्पर्धांमध्ये संधी गमवावी लागली, मात्र त्याने निराश न होता स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द कायम ठेवली. गेल्या आठ महिन्यांपासून तो पुण्यातील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधांमध्ये प्रशिक्षण घेत असून, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन त्याला लाभत आहे.
आता २०३० मध्ये अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी यश खंडागळे हा एक प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्याच्याकडे अजून काही वर्षांचा कालावधी असून, या काळात तो आणखी परिपक्व आणि ताकदवान खेळाडू म्हणून उदयास येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सात वर्षांच्या अथक परिश्रमांचे फळ म्हणून मिळालेले हे रौप्यपदक केवळ एका खेळाडूचे यश नसून एका कुटुंबाचा, प्रशिक्षकाचा आणि संपूर्ण सांगली जिल्ह्याचा अभिमान आहे. यश खंडागळेची ही प्रेरणादायी कहाणी अनेक तरुणांसाठी नक्कीच दिशा देणारी ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या