माध्यम प्रतिनिधी : “पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळा आणि खाद्य तेलाचा वापर मर्यादित ठेवा,” असे थेट आवाहन पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासीयांना केले आहे. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती, वाढते ऊर्जा संकट आणि परकीय चलनावरील ताण लक्षात घेता नागरिकांनी इंधन, तेल आणि आयात वस्तूंचा वापर जपून करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर देशात “लॉकडाऊनसदृश परिस्थितीचे संकेत आहेत का?” अशी राजकीय आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तेलंगणातील हैदराबाद येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी बोलताना मोदी म्हणाले की, भारत मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम पदार्थ आयात करतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर केवळ गरजेनुसार करणे ही काळाची गरज आहे. यामुळे परकीय चलनाची बचत होईल आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा परिणामही कमी होण्यास मदत मिळेल.
दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधानांच्या या आवाहनांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, “देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे. सोशल मीडियावरही “लॉकडाऊनचे संकेत” या चर्चेने वेग घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून तसे संकेतही दिलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त देशवासीयांना विविध प्रकारे बचतीचे आवाहन केले आहे. ज्याचा विपर्यास केला जात आहे.
पंतप्रधान मोदींची देशवासीयांना प्रमुख आवाहने
पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा
खाद्य तेलाचा वापर मर्यादित ठेवा
पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळा
शक्य असल्यास परदेश प्रवास कमी करा
कच्च्या तेलाची बचत करा
परकीय चलन साठा मजबूत ठेवण्यावर भर द्या
मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा
वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन बैठकींना प्राधान्य द्या
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन द्या
नवीकरणीय ऊर्जेवर सरकारचा भर
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सौर ऊर्जा आणि पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवून आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सीएनजी आणि पीएनजीसारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
तेलंगणात ९३७७ कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
हैदराबाद येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुमारे ९३७७ कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण, रेल्वे मल्टी-ट्रॅकिंग, पेट्रोलियम टर्मिनल तसेच औद्योगिक विकास प्रकल्पांचा समावेश आहे।
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या