प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी :स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी धाडसी कारवाई करत रेकॉर्डवरील सराईत आरोपीस अटक करून तब्बल ५ लाख ७३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संजिवकुमार झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महादेव शंकर पवार (वय ३०, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आहे. तर विनोद गोविंद पिंपळे व मिनाबाई चव्हाण हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे गंठण, तुटलेल्या सोन्याच्या साखळ्या आणि बजाज पल्सर एन-१६० मोटारसायकल असा एकूण ५,७३,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १५ मे २०२६ रोजी विटा येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी हिसकावून नेले होते. या घटनेप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बजरंगनगर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित आरोपी महादेव पवार यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच यापूर्वी मकरसंक्रांतीच्या काळातही विटा शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची माहिती उघड झाली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल जप्त केली असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहे.
सदर आरोपीवर यापूर्वीही मालमत्तेविषयक अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या