सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सांगली यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेत त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. २३ मे २०२६ रोजी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेनुसार अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस पथक सांगली ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जुना जकात नाका, इनाम धामणी परिसरात खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चॉकलेटी चौकडीचा शर्ट घातलेला एक संशयित इसम सर्व्हिस रोडवर कमरेला संशयास्पद वस्तू खोचून उभा आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेजजवळील सर्व्हिस रोड परिसरात संशयितास ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीची ओळख शिवम अर्जुन शिगारे (वय १९, रा. गल्ली नं. ४, आण्णा रामगोंडा शाळेजवळ, नारळ चौक, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी पटली. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल आणि पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलीस चौकशीत आरोपीने हे पिस्टल व काडतुसे इचलकरंजी येथील ओळखीच्या गजानन खामकर याच्याकडून दोन वर्षांपूर्वी घेतल्याची माहिती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी करीत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २५ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत पोलीस अंमलदार सुभाष सुर्यवंशी, राजाराम मुळे, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, सचिन कनप, सोमनाथ पतंगे, रूपेश होळकर, सुमित सुर्यवंशी तसेच विजय पाटणकर व कॅप्टन गुंडवाडे यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या