प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिबिरार्थींनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांमुळे निर्माण होणारी भीती आणि त्याच वेळी आपल्या पाल्याने केवळ 21 दिवसात अवगत केलेल्या विविध क्रीडा व कला प्रकारांच्या सादरीकरणाविषयी कौतुक, अशा संमिश्र भावना व्यक्त करत हजारो पालकांच्या उपस्थितीत एम.एस. पी.डी. समर कॅंप 2026 चा सांगता समारंभ शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात मोठ्या दिमाखात साजरा झाला.
बॅरिस्टर जीडी पाटील जिमखाना अंतर्गत कार्याध्यक्ष गौतम पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तब्बल तीस वर्षांपासून चालत आलेली यशस्वी व प्रेरणादायी परंपरा यंदाही राखण्यात एमएसपीडी समर कॅंप 2026 यशस्वी झाला. यंदाही महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान , तामिळनाडू, केरळ या विविध राज्यातील सुमारे 400 शिबिरार्थी या कॅम्पमध्ये सहभागी झाले. सुमारे 40 राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गेले 21 दिवस या शिबिरार्थींनी विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण अवगत केले. याच क्रीडा प्रकारांचे नयनरम्य सादरीकरण शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरातील मध्यवर्ती क्रीडांगणासह विविध क्रीडांगणांवर सादर करण्यात आले . यामध्ये योगा, सूर्यनमस्कार, ॲक्शन सॉंग यांनी या क्रीडा प्रकारांची सुरुवात झाली. तर त्यानंतर लाठीकाठी, दांडपट्टा, जिम्नास्टिक, मल्लखांब, कुस्ती, वॉल क्लाइंबिंग, रॅपलिंग, सैनिकी प्रशिक्षण, कराटे, रायफल शूटिंग आदी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. निव्वळ 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत या मुलांनी अवगत केलेले घोडेस्वारीचे प्रशिक्षण आणि त्याचे सादरीकरण हा या क्रीडा सादरीकरणाचा उच्चतम क्षण ठरला.
दुपार सत्रामध्ये या सर्व शिबिरार्थींनी विविध सांस्कृतिक कलाप्रकारांचेही अत्यंत देखणे सादरीकरण केले. यामध्ये धनगर , आदिवासी, कृष्णा, तांडव , अघोरी ,जोगवा, कांतारा , लावणी, सवाल जवाब , गोंधळ आदी नृत्यांचे सादरीकरण झाले . तर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक नृत्याच्या सादरीकरणाने या सोहळ्याची सांगता झाली.
आजच्या या सांगता समारंभासाठी मुंबईचे धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेकर , सांगली एलसीबीचे डीवायएसपी संजीव झाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर डॉ. दादासाहेब सांगवे- मुंबई, कुमार निकम- केरळा, सर्वेश देसाई ,श्रद्धा देसाई-गोवा, डॉ. मुकेश गुप्ता- राजस्थान , डॉ. आर. बालमुरलीकृष्णन- तमिळनाडू , हेमंत तुलसीयन- चेन्नई, अजय रसाळ- मुंबई, पृथ्वीराज शिंदे, रवी भोडके, रोहन यादव, राजू पाटील, मनोज पाटील - सांगली आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे उपसंचालक डीएस माने यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व हजारो पालकांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात एमएसपीडी समर कॅंप 2026 ची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या