तासगाव :तासगाव शहरातील एका तरुणाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १३ लाख ४९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रवीण राजेंद्र शेटे (रा. शेटे वाडा, माधव प्रेसजवळ, तासगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून नीता जैन आणि ज्योती नावाच्या महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल, असे सांगत त्यांना सोशल मीडियावरील एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले.यानंतर विविध व्यवहारांच्या माध्यमातून संबंधित संशयितांनी वेळोवेळी प्रवीण शेटे यांच्याकडून लाखो रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले. सुरुवातीला मोठ्या परताव्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र नंतर “टॅक्स”, “सर्व्हिस चार्ज” आणि इतर शुल्कांच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी करण्यात आली.
एकूण १३ लाख ४९ हजार ७२५ रुपये उकळल्यानंतर संशयितांनी संपर्क तोडल्याचे समोर आले आहे. फसवणुकीची बाब लक्षात येताच प्रवीण शेटे यांनी तासगाव पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नये, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या