प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
अहिल्यानगर : ग्रामपंचायतीकडे येणारा विकास निधी ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय खर्च केल्यास संबंधित सरपंच व उपसरपंच यांच्यावर पदावरून हटविण्याची कारवाई होऊ शकते, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. ग्रामसभेच्या अधिकारांविषयी जनजागृती करताना त्यांनी युवकांनी गावच्या विकास कामांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.
अण्णा हजारे म्हणाले की, ग्रामसभा ही लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी संस्था असून गावाच्या विकासासाठी येणाऱ्या निधीच्या खर्चावर अंतिम निर्णय ग्रामसभेचाच असतो. शासनाकडून विविध योजनांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होत असला तरी तो निधी कोणत्या कामासाठी खर्च करायचा, यासाठी ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे.
ग्रामसभेची मंजुरी न घेता निधी खर्च केल्यास गावातील किमान २० टक्के नागरिकांनी सह्यानिशी तक्रार अर्ज दिल्यास संबंधित सरपंच व उपसरपंच यांच्याविरोधात पदच्युतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. तसेच संबंधित ग्रामसेवकावरही बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी युवकांना ग्रामसभेचे अधिकार, ग्रामपंचायतीचे कामकाज आणि विकास निधीच्या वापराबाबत अभ्यास करण्याचे आवाहन केले. ग्रामसभा हीच खरी लोकशाहीची पायाभूत संस्था असून पारदर्शकता, जबाबदारी आणि गावाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या