सांगली प्रतिनिधी : हरिपूर, ता. मिरज येथे हरिपूर क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हरिपूर प्रीमियर लीग पर्व ४ क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. शनिवार दि. २३ मे व रविवार दि. २४ मे २०२६ रोजी हरिपूर येथे रंगलेल्या या स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग नोंदवला होता.
अंतिम सामन्यात संघमालक परशराम बिराजदार व शंकर अण्णा माळी यांच्या सिंधुदुर्ग संघाने संघमालक राहुल भोई व गणेश खांडेकर यांच्या सिंहगड संघावर रोमहर्षक विजय मिळवत स्पर्धेचे मानकरी होण्याचा बहुमान मिळवला. सिंहगड संघाने उपविजेतेपद पटकावले.
तृतीय क्रमांकासाठी संघमालक ज्ञानेश सूर्यवंशी यांच्या जंजिरा संघाला व संघमालक विजय मोहिते यांच्या तोरणा संघाला संयुक्तपणे गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गजानन मुधोळ याला “सर्वोत्कृष्ट खेळाडू” तसेच “सर्वोत्कृष्ट गोलंदाज” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर स्वप्नील कांबळे याने “सर्वोत्कृष्ट फलंदाज” हा किताब पटकावला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात नगरसेवक बाळू दादा बेलवलकर, रणवीरसिंग मोहिते, हर्षवर्धन बोंद्रे, विनायक तांबवेकर, राहुल गुरव व मास्टर बबलू आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या