प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पोलीस अधिकारी व केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून “डिजीटल अरेस्ट”ची भीती दाखवत तब्बल ५९ लाख ०९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला सांगली सायबर पोलीस ठाण्याने अटक केली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांच्या नव्या फसवणूक पद्धतीचा पर्दाफाश झाला आहे.
याबाबत फिर्यादी आण्णासाहेब बाळगोंडा पाटील (वय ६१, रा. सुतार गल्ली, सावळज, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी तक्रार दिली होती. सेवानिवृत्त असलेल्या पाटील यांना आरोपींनी फोन व व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून आपण पोलीस, सीबीआय, इन्कम टॅक्स तसेच इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले.
आरोपींनी व्हॉट्सअॅपवर सीबीआयचे लोगो, “गव्हर्नमेंट ऑफ इंडिया”, “सुप्रीम कोर्ट”, “इन्कम टॅक्स”, “रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया” यांच्या नावाची बनावट पत्रे पाठवून अटक करण्याची धमकी दिली. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो देखील लावले होते. या भीतीपोटी फिर्यादींकडून ५९ लाख ०९ हजार रुपयांची रक्कम उकळण्यात आली.
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये अबु हुसेन समसुल आलम (वय ३८, सध्या रा. हडपसर, पुणे, मूळ रा. मुरशीदाबाद, पश्चिम बंगाल) आणि सुशील अकील राम (वय ३४, सध्या रा. मगरपट्टा सिटी, पुणे, मूळ रा. पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे.
तपासादरम्यान फिर्यादींच्या फसवणुकीतील २९ लाख ६० हजार रुपयांची रक्कम आरोपींच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींच्या घरझडतीत ४ मोबाईल फोन, विविध बँकांचे १८ डेबिट-क्रेडिट कार्ड, २४ चेकबुक, ६ पासबुक, ६ सिमकार्ड, ६ रिकामे पाकीट तसेच आधार व पॅन कार्ड असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीचे आणखी धागेदोरे शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास सांगली सायबर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सहायक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे तसेच सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या