सांगली प्रतिनिधी : येथील सिटी हायस्कूल च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा मातेच्या प्रेमापोटी सी. सी. टीव्ही युनिट भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
सांगलीतील सिटी हायस्कूल मधील प्रांगणात सन १९७४ मध्ये ११ वीत शिक्षण घेतलेली ५१ विद्यार्थी व विद्यार्थिनी ५१ वर्षांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्रीत आली होती. जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर रममाण होतानाच गाणी नृत्य आदी मनोरंजन, सत्कार समारंभ, स्नेह भोजन मध्ये सहभागी झाले.
परंतु या दरम्यान अनेक जणांच्या नजरेत एकच गोष्ट खटकली, ती म्हणजे एवढ्या मोठ्या शाळेत सी. सी. टीव्हीची कमतरता.
संमेलन आयोजक शिरीष उकीडवे, वेदवती कुलकर्णी, संजीव खांडेकर, हेमंत पाठक, प्रदीप ताम्हणकर, शाळेच्या पर्यवेक्षक प्राची गोडबोले आदिनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लागलीच २ लक्ष ५७ हजार रुपये कृतज्ञता निधी एकत्रीत जमवून शाळेच्या मुख्याध्यापक मधुकर कांबळे यांचेकडे सुपूर्द केला.
अन् आज तो भाग्याचा क्षण आला. संपूर्ण शाळा सी. सी. टीव्ही. कक्षेत आली. शाळेची माजी विद्यार्थीनी वेदवती कुलकर्णी हिच्या शुभहस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले व सी. सी. टीव्ही युनिट कार्यान्वित करण्यात आले.
यावेळी बोलताना वेदवती कुलकर्णी म्हणाल्या की, माझे वडील डी.एस. कुलकर्णी या शाळेचे नामवंत शिक्षक होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या त्यांच्या वतीने मी या फलकाचे अनावरण करित आहे. हात माझे असले तरी प्रेरणा बाबांची होती.
यावेळी सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, संचालक विजय भिडे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर, नंदकुमार बापट , आनंद शिंदे, किरण कुलकर्णी, सुरेश गोडबोले, श्रीमती लता आडकर, श्रीमती सुनीता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या