सांगली प्रतिनिधी : मिरज तालुक्यातील सधन आणि एकोप्याने नांदणाऱ्या बिसूर गावात रविवारी (दि. १० मे) “बिसूर ग्रामपंचायत – गती, प्रगती आणि दिशा-दशा” या विषयावर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील विकास आराखड्याची दिशा निश्चित करण्यासाठी आयोजित या बैठकीस ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बैठकीमध्ये आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच गावाच्या भविष्यातील विकास कामांची रूपरेषा, नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधा, गाव सुधारणा आणि शासकीय निधीचा प्रभावी वापर यावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. प्रदीप बाळकृष्ण माने पाटील (माजी लोकनियुक्त सरपंच, सावर्डे, ता. तासगाव तथा अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद, पश्चिम महाराष्ट्र) यांनी ग्रामविकासासाठी नियोजनबद्ध काम, शासकीय योजनांचा योग्य पाठपुरावा आणि लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. “गावाचा विकास ही केवळ जबाबदारी नसून ती अभिमानाची बाब आहे,” असे सांगत त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी लोक/ग्राम प्रशासन अभ्यासक तथा शिवसेना शिव उद्योग सहकार सेना सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी युवक, महिला आणि ग्रामस्थांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “गावाने मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. जगाच्या नकाशावर बिसूर गावाचे नाव पोहोचवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन विकासाच्या कामात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच सतीश निळकंठ यांनी प्रास्ताविकातून बैठकीमागील उद्देश स्पष्ट केला. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी पोलिस पाटील सतीश पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत घारगे, मेघा कदम, विकास पाटील, किरण पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, प्रकाश वसेकर, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, सिद्धेश्वर सुरवसे आणि अजय पाटील यांनी केले. बैठकीस सर्व ग्रामपंचायत सदस्य, बिसूर गावातील बंधू-भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे बैठकीला सकारात्मक आणि विकासाभिमुख वातावरण लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या