प्रतिष्ठा न्यूज
सांगली : घरपट्टी वाढीबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी सांगली, मिरज, कुपवाड शहरातील नागरिकांच्या मनातील शंकांचे निरसन करा. सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी आयुक्त संजिता महापात्र यांना केल्या.
आयुक्त महापात्र यांनी घरपट्टी वाढीबाबत सर्वच लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली आहे, असे सांगितले होते. प्रत्यक्षात खासदार पाटील यांच्याशी त्यांची चर्चाच झाली नव्हती. त्यामुळे आज खास घरपट्टी वाढीच्या मुद्यावर श्री. पाटील यांनी आयुक्तांची भेट घेत विषय समजून घेतला. त्यांनी सांगलीकरांच्या मनात, व्यापारी, उद्योजकांच्या मनात ज्या शंका आहेत, त्यांचे निरसन झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याआधीच्या बैठकांमध्ये जे ठरले होते, ते समजून घेऊन प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे, घाईघाईत निर्णय लादू नका, अशी सूचना त्यांनी केली. आयुक्त महापात्र यांनी या प्रकरणी जी कार्यवाही सुरु आहे, त्याची सविस्तर माहिती खासदार पाटील यांना दिली. या बैठकीनंतर श्री. पाटील यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत संवाद साधला. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या कक्षात खासदारांचे स्वागत केले. तीनही शहरातील काही प्रश्न असतील, विकासाचे मुद्दे असतील तर सांगा. त्यासाठी ताकद दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी नगरसेवकांना दिली. काही कामांबाबत नगरसेवकांना सोबत घेऊन आयुक्तांना सूचना केल्या. नगरसेवक राजेश नाईक, मयूर पाटील, हर्षवर्धन पाटील, अॅड. बिलकीस बुजरुक, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या